वेंधळी परी - Parichya Goshti - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

January 11, 2020

वेंधळी परी - Parichya Goshti

Marathi Naveen Parichya Goshti for Kids Story in Marathi

वेंधळी परी - Parichya Goshti


वेंधळी परी - Parichya Goshti


‘पिक्सी’ नावाचं जादूचं राज्य होतं. त्यात खूप सा-या प-या रहायच्या. जादुगार रहायचे, चांगल्या चेटकिणी रहायच्या. खूप अद्भूत होतं ते राज्य. त्या राज्यात जादूच्या शाळा होत्या, बागीचे होते. इतकच काय जादूची घरं आणि बाजारही होते. राज्यातल्या सगळ्या प-या, छोटे छोटे जादुगार रोज शाळेत जादू शिकण्यासाठी जायचे. तिथे अभ्यास करायचे, खेळायचे, मस्ती करायचे. त्या राज्यात चिंगी नावाची परी रहायची. छोटासा पिवळा फ्रॉक, दोन वेण्या आणि इवलेसे पंख असलेली चिंगी दिसायला खूप गोड होती. तिचे डोळे घारे होते, गाल गुलाबी होते आणि ओठ तर छान लालचुटूक होते. ती स्वभावानेही बिचारी गरीब होती. पण चिंगी खूप वेंधळी होती. कुठलीच गोष्ट ती नीट करत नसे. तिला कुठलही काम सांगितलं तर ते तिच्याकडून धड होत नसे. शाळेत तर दरदिवशी कुठलं ना कुठलं पुस्तक ती विसरलेली असायची. कधी कधी तर खाऊचा डबाच न्यायला विसरायची. चिंगीची आई तिला खूप समजवायची. ‘अगं चिंगी इतकं वेंधळही असू नये गं!’ पण चिंगीच्या डोक्यात मात्र काही प्रकाश पडत नसे.

‘पिक्सी’मध्ये चेटकिण आजीबाई पण रहायच्या. त्या खूप प्रेमळ होत्या. लहान प-यांना, छोट्या जादुगारांना त्या खाऊ द्यायच्या. राज्यातल्या प-यांना, जादुगारांना आणि प्राण्यांना मदत करायच्या. आपल्या मंत्रांनी त्यांना बरं करायच्या. सगळ्यांचे लाड करायच्या. सगळ्यांच्या खूप लाडक्या होत्या त्या. प-या त्यांना 'चेटकिण आजी' म्हणायच्या. चिंगीच्या तर त्या फार आवडत्या होत्या. शाळा सुटली की ती पहिले चेटकिण आजीच्या घरी जायची, आजीच्या हातचा खाऊ खायची आणि मगच घरी जायची.

एकदा काय झालं, चिंगी आपली रमत गमत बाजारातुन चालली होती. तेवढ्यात तिला चेटकिण आजीने हाक मारली. त्याचं काय झालं, चेटकिण आजी चालली होती दुस-या राज्यात औषधाचं जिन्नस आणण्यासाठी. पण तिला नेमका झाला होता उशीर. त्यात तिला मध्ये बरीच कामं उरकायची होती. पण आता वेळ कुठे होता. तेवढ्यात आजीला चिंगी चाललेली दिसली. ‘अगं ए चिंगी…’ आजीने हाक मारली. चिंगीने आजीची हाक ऐकली आणि गेली आजीकडे. ‘काय झालं गं आजी? आणि तु कुठे चालली आहेस, एवढं सामान घेऊन?’ चिंगीने तिच्या हाताल्या वेगवेगळ्या पिशव्या बघून आजीला विचारलं. ‘अगं मी जरा चाललेय दुस-या राज्यात, औषधाचं जिन्नस आणायला. पण माझी काही कामं करायची आहेत. तु करशील?’ आजीने विचारलं. ‘हो करेन की!’ चिंगी मोठ्या उत्साहात म्हणाली. ‘बघ हं, पण कुठेही वेंधळेपणा करायचा नाही. आणि सगळी कामं केलीस की मग तुला मोठीच्या मोठी बेरी मिळेल. कबुल?’ आजीने चिंगीला विचारलं. पण बेरी मिळणार म्हटल्यावर चिंगी तर नाचायलाच लागली. ‘हो आजी. नक्की करेन. तु सांगुन तर बघ ना मला कामं.’ चिंगी म्हणाली. मग आजीने चिंगीच्या हातात एक यादी दिली आणि बरोबर जिन्नस असलेल्या काही पिशव्या पण दिल्या. आणि सांगितलं, ‘हे बघ चिंगी, वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी जिन्नसं आणि वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या आहेत. नीट ने.’ पण चिंगीने तिची सुचना काही नीट ऐकलीच नाही. ‘हो गं आजी. देईन मी नीट.’ चिंगी हसत म्हणाली. आणि आजी चिंगीचा निरोप घेऊन दुस-या राज्यात जाण्यासाठी निघाली.

चिंगीने पाहिलं काय तर, त्यात वेगवेगळ्या रंगाच्या थैल्या होत्या. पिवळी, निळी, लाल, जांभळी, हिरवी आणि चंदेरी अशा एकूण सहा थैल्या होत्या. चिंगीने एकेक यादी वाचायला सुरुवात केली. त्यात एकूण सहा गोष्टी होत्या. सॅमी जादुगाराला ‘ब्लु बेरीं’चा रस करण्यासाठी मंत्रांची एक पिवळी थैली द्यायची होती, भूभू कुत्र्याला त्याच्या आजारी पिल्लुसाठी औषधाची लाल थैली द्यायची होती, जादुच्या पूस्तकाचं वाचनालय चालवणा-या राजू नावाच्या छोट्या जादुगाराला, पुस्तकं नीट लावण्यासाठी एक मंत्र द्यायचा होता, तो होता जांभळ्या पिशवीत तर बंटी सशाला गाजरं मोठी करण्यासाठी काही औषधं हवी होती ती होती निळ्या पिशवीत, मॅडी नावाच्या एका परीने आपल्या डिंकाच्या झाडातुन अजुन डिंक येण्यासाठी औषध मागवलं होतं, जे होतं हिरव्या थैलीत आणि डिक्सी नावाच्या चेटकिणीला पाऊस पाडण्यासाठी ढग आणि वीजा हव्या होत्या आणि त्या होत्या चंदेरी पिशवीत.

‘हॅ! फक्त सहाच गोष्टी तर आहेत. त्या काय माझ्या पटकन देऊन होतील.’ चिंगी मोठ्या मिजासीत म्हणाली. आणि तिने पहिलं नाव वाचलं. ‘सॅमी जादुगार’. चिंगीने नाव वाचलं खरं पण त्याला नक्की कुठल्या रंगाची थैली द्यायची, ते मात्र काही वाचलं नाही. शेवटी वेंधळी चिंगीच ती! ती गेली सॅमी जादुगाराकडे. पाठीवरुन तिने एक थैली काढली. ती होती निळ्या रंगाची. जादुगाराला कुठल्या रंगाची थैली द्यायची हे न वाचताच चिंगीने ती थैली त्याला देऊन सुद्धा टाकली. मग ती गेली भूभू कुत्र्याकडे, त्याचं पिल्लू आजारी होतं बिचारं, त्याला चिंगीने हिरवी थैली दिली. राजूला दिली चंदेरी पिशवी, बंटी सशाला दिली पिवळी थैली, मॅडी परीला दिली लाल पिशवी आणि डिक्सी चेटकिणीला दिली जांभळी पिशवी.

चेटकिण आजीने सांगितलेली सगळी जिन्नसं चिंगी देऊन आली. तिचं हे काम होईपर्यंत संध्याकाळ होत आली होती. चेटकिण आजी येण्याची वेळ झाली होती. चिंगीला वाटलं ‘अरे वा काय काम केलय आपण. आता आपल्याला मोठी बेरी नक्की मिळणार.’ ती चेटकिण आजीच्या येण्याची वाट बघत बसली. संध्याकाळचे सहा वाजत आले होते. चिंगीला चेटकिण आजी दुरुन येताना दिसली. चिंगीने पटकन जाऊन आजीला तिने सगळी कामं केल्याचं सांगितलं. चिंगीने सगळी कामं केली हे ऐकुन आजीलाही खूप बरं वाटलं. ‘चल, आता तुला मी मोठी बेरी देते.’ आजी म्हणाली. तेवढ्यात सॅमी जादुगार, भूभू कुत्रा, बंटी ससा, राजू छोटा जादुगार, मॅडी परी, डिक्सी चेटकिण आजीच्या समोर येऊन उभे राहिले. ते सगळे रागावलेले दिसत होते. त्यांनी विचारलं, ‘आजीबाई तुम्ही कुठला मंत्र दिलात आम्हाला?’ ‘का? काय झालं?’ आजीने मोठ्या आश्चर्याने विचारलं. ‘मला ब्लु बेरीचा रस काढण्यासाठी मंत्र हवा होता. पण माझ्या ब्लु बेरींचा रस निघण्याऐवजी त्या चांगल्या अजुनच मोठ्या झाल्यात.’ सॅमी चिडून म्हणाला. ‘माझी पिकं मोठी होण्याऐवजी त्याचा रस निघाला.’ बंटी ससा म्हणाला. ‘माझ्या पिल्लुची सर्दी बरी होण्याऐवजी त्याच्या नाकातुन अजुन शेंबुड गळायला लागला.’ भूभू सांगत होता. ‘माझ्या तर झाडाने डिंक देणच बंद केलय आता.’ मॅडी चिडून म्हणाली. ‘माझी पुस्तकं पावसामुळे भिजली.’ राजूने सांगितलं. ‘आणि माझ्या इथे तर पाऊस काय, साधे ढगही आले नाही.’ डिक्सीने रागावून म्हटलं. त्यांच्याबाबतीत एवढं झालेलं बघून आजीला खूप आश्चर्य वाटत होतं. ‘कुठल्या पिशव्या मिळाल्या तुम्हाला?’ आजीने विचारलं. प्रत्येकाने त्यांना मिळालेल्या पिशव्याचे रंग सांगितले. आणि मग झालेला सगळा प्रकार आजीच्या लक्षात आला. चिंगीने सगळा घोळ घातलेला आहे, हे आजीच्या लक्षात आलं. चिंगीने यादी नीट न वाचता तशाच पिशव्या देऊन टाकल्या होत्या. त्यामुळे ज्या कामासाठी त्यांना मंत्र आणि औषधं हवी होती, ती मात्र त्यांना मिळालीच नाही. चिंगीने घातलेला सगळा घोळ पाहून सगळेजण तिला खूप रागावले. तिच्या वेंधळेपणामूळे सगळ्यांचच नुकसान झालं होतं. ‘काय चिंगी करणार का परत वेंधळेपणा?’ आजीने चिंगीचा कान पिळत तिला विचारलं. ‘ मला माफ करा. मी असा वेंधळेपणा करणार नाही. परत कधीच करणार नाही.’ चिंगी रडत रडतच म्हणाली. मग चेटकिण आजीने एक मंत्र म्हणून सगळ्यांचं नुकसान भरुन दिलं. हं! पण झालेल्या सगळ्या प्रकारामुळे चिंगी सुधारली, खूपच सुधारली. आणि तिने वेंधळेपणा कायमचा सोडून दिला.

4 comments:

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();