आबा - Marathi Bhutachya Goshti - Marathi goshti

मराठी छान छान गोष्टी लहन मुलांसाठी व मोठ्यांसाठी 30 मजेदार गोष्टी मराठी मधे

December 27, 2019

आबा - Marathi Bhutachya Goshti

 Marathi Bhutachya Goshti


आबा


भालचंद्र वैद्य रस्त्याच्या एका बाजूला उभा होता. हातातील ब्याग एका बाजूला ठेवून तो बंद पडलेल्या एस.टी बस कडे बघत होता. बसचा कंडक्टर आणि चालक बस दुरुस्तीचा प्रयत्न करीत होते. दोन चार इतर प्रवासीही हतबल पणे उभे होते.

डॉक्टरकीची परीक्षा देऊन भालचंद्र मुंबईहून कोल्हापूरला त्याच्या खेडे गावात आई वडिलांना भेटायला आणि सुट्टी घालवायला आठवडाभर आला होता. भालचंद्रच्या घरात नावाने आणि पेशाने सगळे वैद्यच.

घाट उतरता उतरता अचानक एस. टी. बस मध्ये बिघाड झाला आणि बस बंद पडली. रात्रीचे ११.३० वाजले असतील. अर्धा तास भालचंद्र तसाच उभा होता. आधीच बसला वेळेनुसार बराच उशीर झाला होता. इतक्यात कंडक्टर प्रवाश्यांकडे आला आणि म्हणाला, “बस चालू व्हायला उशील लागल, म्याक्यानिक आणावा लागल. माफ करा पण तुम्हाला इथून पुढ या एस. टी ने जाता येणार न्हाय...”

भालचंद्र वैतागला होता काय बोलावे आणि काय नाही तो गप्प उभा होता. इतर प्रवासी काहीबाही बडबडत रस्त्यावर इतर वाहनांना हात दाखवत होते पण कोणी थांबेल तर शपथ.

सरळ रस्त्याने चालत गेलो तर किमान दोन तास तरी लागतील. एखादे वाहन मिळाले तरी फाट्यावरून चालत वीस मिनिटे जावे लागेल. भालचंद्राचे विचारचक्र चालू होते. भालचंद्राने मागे वळून पहिले. एक छोटा डोंगर होता, त्याच्या माहितीतला. मारुतीची टेकडी. लहानपणा पासून तो या टेकडीवर खेळत आला होता. चढायला सोपी पण थोडी पसरत अशी ती टेकडी होती.

टेकडी चढून उतरलो तर पायथ्याशीच आपला गाव. अवघी तीस मिनिट लागतील. त्याने हातातील घड्याळ उगाचच सरळ केल्यासारखे करून वेळ पहिली. मध्यरात्र सुरु झाली होती १२ चा काळ उलटून पाच दहा मिनिटे झाली होती. त्याने क्षणभर विचार केला आणि खाली ठेवलेली ब्याग उचलली.

भालचंद्र चालत टेकडीच्या पायथ्याशी आला. ब्यागेतून त्याने छोटेखानी टोर्च काढला त्याच्या अंधुक प्रकाशात तो टेकडी चढू लागला. आजूबाजूला काळामिट्ट अंधार पसरला होता. रातकिड्याचे किर्र गायन वातावरणात एक गूढ निर्मिती करीत होते. इतर वेळी भालचंद्र झपझप टेकडी चढून उतरला हि असता पण आज का कुणास ठाऊक पण त्याचे पाय अगदी सावधपणे पडत होते. माहितीतील रस्ता असूनही मनात एक अनामिक भीती भालचंद्रच्या मनात उठत होती. काही वेळात भालचंद्र टेकडी चढून वर आला. समोर निळसर पण गडद अंधार होता. गार वारा सुसाट वाहत होता. उजव्या बाजूला आणखी एक चढ टेकडीच्या वरच्या अंगाला जात होता तेथे शेत जमीन होती. तेथे त्याचा मित्र रंगा पाटलाचा मळा होता. क्षणभर भालचंद्रला वाटले, मळ्यावर जावे आणि रंग्याला घेऊन जावे सोबत. पण रंग्याहि मळ्यावर नसला तर. कापणीचा हंगामहि सरून गेला होता. मळ्यावर कदाचित कोणी नसेलही. असा काहीसा विचार करत भालचंद्र उभा होता.

मळ्यावर जाण्याचा विचार मनातून काढून भालचंद्र पुढे चालू लागला आणि इतक्यात समोरून कोणीतरी येत असल्याचा भास भालचंद्रला झाला. दाट झाडी आणि झुदुपांमुळे अंदाज लागत नव्हता पण कोणीतरी त्याच्या दिशेने येत होते. भालचंद्रने टोर्च त्या दिशेने फिरवला पण चार पाच पावलापुढेच त्याचा प्रकाश खुंटत होता.

इतक्या रात्री कोण असावे या निर्जन टेकडीवर या विचाराने भालचंद्रच्या छातीत धडकी भरली. पुढे जावे कि मागे पळावे, त्याला काही सुचेना. गार वार्यातही त्याच्या कपाळावर घाम जमा होऊ लागला. तो हळू हळू डावीकडे सरकू लागला आणि एका झाडामागे जाऊन उभा राहिला. समोरून कोण येत असावे हे पाहण्यासाठी तो हळूच मान वाकवून झाडामागून बघत होता. समोरून येणारी व्यक्ती हळू हळू जवळ येत होती. अंधुक निळ्या प्रकाशात ती व्यक्ती भालचंद्रला दिसू लागली. साधारण सहा फुट उंच अशी ती व्यक्ती हातात काठी घेऊन पुढे चालत येत होती. डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढराशुभ्र सदरा आणि धोतर असा पेहराव होता. तो माणूस चालत चालत भालचंद्रच्या बराच जवळ आला.

भालचंद्रला ती व्यक्ती आता स्पष्ट दिसली होती. भालचंद्र उडी मारून झाडाबाहेर आला.
“दादा तुम्ही”, भालचंद्र. भालचंद्र त्याच्या वडिलांना दादा म्हणायचा (ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वडिलांना दादा म्हणण्याची पद्धत अजून हि आढळून येते).
“भाल्या अरे तू टेकाडावर कशापायी आलास रस्ता न्हाय व्हय याला”, दादा.
भालचंद्रने बंद पडलेली एस.टी आणि झालेल्या उशिराबद्दल सविस्तर सांगितले.
“पण इतक्या रात्रीचे तुम्ही या टेकाडावर कसे आणि कुठे निघालात”, भालचंद्र.
“अरे अडलेल्याची मदत करायची रीत आपली, मित्राकड निघालो व्हतो... पर ते जाऊदे तू आता चल माझ्यासोबत तुला टेकाड उतरून देतो आणि परत जातो मित्राकड”, दादा.

भालचंद्र दादांकडे पाहत होता. गेल्या सहा महिन्यात बराच फरक दादांच्या चेहऱ्यात आला होता. सुरकुत्या वाढल्या होत्या. वयही बरेच वाढल्यासारखे वाटत होते.

टेकडीवरचा वारा अधिकच थंड जाणवू लागला. रात किड्यांची कीर कीर थांबली होती आणि वातावरण अधिक गुढरम्य भासत होते. हळू हळू अंगाला झोम्बणाऱ्या गार वाऱ्याने भालचंद्र थोडा अस्वस्थच झाला होता.

जास्त काही न बोलता दादा मागे वळून चालू लागले आणि भालचंद्र त्यांच्या मागून चालू लागला. काही काळ कोणी काहीच बोलले नाही. दादा भालचंद्र पासून पुढे झपझप चालत होते.

“दादा येवड्या रात्रीच कोणाला घेऊन तरी बाहेर पडायचं. एकटे का निघालात”, भालचंद्र.

“गड्या गाव आपला, रस्ता आपला कशाला कोणाची भीती हाय”, दादा.

पुढचे पंधरा वीस मिनिटे इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये गेले. चालता चालता कधी टेकडी उतरून आलो भालचंद्रला कळालेच नाही.

“बर.. भाल्या तू घरला जा मी माग फिरतो”, दादा.

बर म्हणून भालचंद्र तसाच उभा राहिला. दादा मागे वळून झुडपांमध्ये गडपहि झाले. भालचंद्र चालत चालत घरी आला. रात्रीचा एक वाजला होता. घरी भालचंद्रची आई वाट पाहत होती. मिनिमिनता छोटा दिवा भिंतीच्या एका कोपर्यात ठेवला होता. वनी त्याची छोटी बहिण झोपली होती.

“भालू, इतका उशीर होय रे, काय झाल? तुझे दादा तुला बघायला भायेर गेले”, आई.
“अग आई एस.टी बिघडली होती म्हणून उशीर झाला आणि रस्त्याने चालत आलो असतो तर अजून दोन तासांनीच आलो असतो.”
“आणि दादा भेटले मला टेकाडावर...”, भालचंद्र.
“टेकाडावर...”, आईचा आश्चार्योदगार.
“का ग काय झाल?”, भालचंद्र.
“पर हे तर त्यांच्या मित्राच्या मोटारीन गेले आणि फाट्यावर जाऊन बघतो म्हणाले.”, आई.
क्षणभर कोणी काहीच बोलले नाही. भालचंद्रहि थोडा गोंधळला.
“बर असुदे मी हात पाय धुऊन घेतो” म्हणत भालचंद्र मोरीकडे वळला.

सर्व आवरून भालचंद्र आणि आई दादांची वाट पाहत बसले तसे दादा एका मोटारीवरून अंगणात आले. भालचंद्रकडे बघून त्यांचा जीव भांड्यात पडला.
“भाल्या अरे कुठ कुठ शोधायचा तुला, इतका का उशीर, कुठ होतास?”, दादांनी प्रशाचा भडीमार चालू केला.
भालचंद्र मात्र स्तब्ध उभा दादांकडे फक्त बघत उभा होता.
दादा जर मला टेकाडावर भेटले नव्हते तर तो माणूस कोण जो माझ्यासोबत...
भालचंद्र विचार करत करत अंथरुणावर पडून होता. कोपर्यातल्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश भिंतीवरच्या ओळीने लावलेल्या फोटोंवर पडला होता. ओळीने एक एक फोटो तो पाहत होता आणि त्याची नजर पडली त्याच्या दिवंगत आजोबांच्या फोटोवर. तोच चेहरा अगदी तंतोतंत. धारदार नजर, किंचित बसके पण सरळ असे नाक. मूडपलेले पातळ ओठ आणि झुबकेदार मिशा. दादा अगदी आबांसारखेच दिसतात...



Marathi goshti bhutachya katha naveen marathi story in ghost 

No comments:

Post a Comment

'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();